Saturday 20 May 2017

राजकीय घटितांचे अन्वयार्थ



            राजकीय घटितांचे अन्वयार्थ
भारताच्या राजकीय वाटचालीतील घटितांचे हवे ते अन्वयार्थ लावण्याचे काम अतिशय पध्दतशीरपणे आपल्या सोईच्या राजकारणासाठी होत असल्याचे दिसते आहे. यात घडणाऱ्या साऱ्या घटना या ही एक अपरिहार्य बाब असली तरी त्यांची कारणमीमांसा, निकाल वा परिणाम यांचे विश्लेषण मात्र ज्या निष्पक्षतेने व्हायला हवे, ते न होता एका विशिष्ठ विचाराच्या पुष्टीकरणासाठी केले जात असण्याचा संशय यावा इतपत बटबटीतपणे केले जात आहे. एकतर सारी घटिते ही संवैधानिक व लोकशाही मार्गाने होत असल्याने त्यांच्या अवैधपणाच्या कुठल्या शंका न घेता त्यातील रूढ, स्विकारलेल्या, साकारलेल्या साऱ्या संकल्पनानुरूप होत असल्याने कुणाला तशी हरकत घेण्याचेही कारण नाही. मात्र जनतेच्या पातळीवर या साऱ्या स्थित्यंतरांचे हे जे काही अर्थ लावले जात आहेत ते पचनी पडण्याचे काम मात्र काहीसे अनोळखी, भितीदायक व संशयास्पद ठरू लागले आहे. या मार्गाने जनमत तयार होतांना त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाशी हे विश्लेषण तादात्म्य पावत नसल्याने शेवटी खरे काय या गोंधळसदृश परिस्थितीला येऊन पोहचले आहे. या साऱ्या प्रकाराला कारणीभूत असलेली निश्चित अशी कारणे आहेत व त्याचे सारे संदर्भ हे तुलनात्मक राजकारणासाठी न वापरता एका निखळ लोकशाहीला अपेक्षित असणाऱ्या बदलांचा मागोवा पुढे जात असतांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरण्याच्या दृष्टीने लक्षात घेणे आवश्यक आहे, अन्यथा जंगलात वाट चूकलेल्या व मार्ग न सापडणाऱ्या वाटसरूंसारखी साऱ्यांची अवस्था व्हायची शक्यता आहे.
या प्रकाराला कारणीभूत असणारी सारी कारणे व आयुधेही ही एकाच प्रकारची आहेत. भारतीय राजकारणातील काही वास्तवांचा चपखलपणे वापर करत हे शक्य असल्याचे सिध्द होत आहे. एकतर लोकशाहीत होत असलेल्या साऱ्या बदलांना स्व-अर्थ लावून आपल्या बाजूला वळवत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न व त्यामुळे खरा मार्ग शोधणाऱ्यांची होणारी पंचाईत लक्षात घ्यायला हवी. यात कालहरणापेक्षा सर्वसामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत होऊन सनदशीर मार्गापेक्षा इतर मार्गाने आपले इप्सित साधण्याचा काही समाज घटकांचा प्रयत्न नाकारता येणार नाही. व तसे ते घडूही लागल्याचे दिसते आहे. हे सारे घडवण्याचे पध्दतशीर मार्ग काही मानसशास्त्रीय संकल्पना, अत्यानुधिक संपर्क तंत्रज्ञान, लोकेच्छा वा असंतोष शमवणारी तथाकथित तार्किक मांडणी, प्रसंगी खोटी व भुलवणारी आश्वासने, माध्यमांवरील अतिक्रमण व जनतेच्या खरी माहिती मिळवण्याच्या अधिकाराची गळचेपी, या साऱ्यांचा चाणाक्षपणे वापर करीत साध्य केले जात आहे.
आता एकाद्या निवडणुकीत मिळवलेला विजय व त्यातून किती अर्थ पिळून आपल्याकडे वळवावेत याला काही धरबंध राहिलेला नाही. निवडणुकीतले यश हे बहुपेडी असते व जनतेच्या दृष्टीने अनेक अपरिहार्यतांचा तो एक परिपाक असतो. अशी निवड ही सर्वार्थाने अंतिम वा स्वेच्छादर्शक नसते. एका प्राप्त परिस्थितीत पुढच्या बदलापर्यंत घेतलेली ती एक उसंत असते. यात पर्यायांची उपलब्धता व निवडणुकांची तांत्रिकता हा एक महत्वाचा घटक विसरला जातो व जनतेने आम्हाला हुडकून हुडकून मतदान करून स्वेच्छेने निवडून आणले असा भास निर्माण केला जातो. भाजपा या केवळ सत्ताप्राप्तीसाठी झपाटलेल्या मानसिकतेला जनतेने  काँग्रेसच्या अभूतपूर्व गलथानपणानंतर सत्तेवर आणले व तेही भाजपाने जनतेला दिलेली अभिवचने व सुराज्याचे निर्माण केलेले चित्र ज्या पध्दतीने ठसवण्यात आले याचा समावेश होतो. या विजयानंतर आता भारतीय राजकारणात एक नवे पर्व सुरू झाले असून पूर्वीच्या साऱ्या राजकीय संस्कृतीला छेद देत, नवीन पायंडे व प्रतिके निर्माण करत खरोखर काहीतरी बदल होतोय असे वातावरण तयार करण्यात आले. जनतेच्या दृष्टीने मानसिक पातळीवर हा बदल सुखावणारा असला तरी नंतरच्या काळात जनतेच्या जीवनात खरोखर काही सकारात्मक सुधार झाल्याचे दिसले नाही.
भाजपाचा भारतीय राजकारणातील हा प्रवेश हा तसा ऐतिहासिक दाखवला जात असला व जनता आता या नव्या बदलाला सिध्द झाली आहे असे दाखवण्याच्या काळातच या प्रचाराला छेद देणारा दिल्लीत आपला सदुसष्ट व भाजपाला केवळ तीन जागा देणारा निकाल लागला, खुद्द गुजराथमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत भाजपाला लोकांनी नाकारल्याच्या बातम्या होत्या. त्याचे विश्लेषण मात्र भाजपाने आपले माध्यमांतील वजन वापरत फारसे जनतेच्या नजरेत येऊ दिले नाही. याच काळात बिहारमध्ये त्याच भाजपाला मिळालेले अपयश, त्याचेही मूल्यमापन फारसे होऊ शकले नाही. यावरून भाजपाची ही निखळ यश वा  ध्येयधोरणांपेक्षा आपल्या लोकशाहीतील कमतरतांचा चाणाक्षपणे गैरफायदा घेत सत्तेवर येण्याची खेळीच समजली पाहिजे. आताही उत्तर प्रदेशातील विजयाची कारणे भाजपाला लोकांनी स्विकारल्याचा दावा करीत असली तरी प्रत्यक्षात लोकांनी काँग्रेस, समाजवादी वा बसपाला नाकारण्याची ती एक लाट होती व दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने उरलेल्या भाजपाच्या पारड्यात ते यश भाजपा केवळ तेथे असल्याने पडू शकले. या निवडणुकीत भाजपाची सारी भिस्त ही धर्मजातींच्या आधारावर बेतलेली असली तरी त्यांना मिळालेले यश पहाता मतदारांनीच जातधर्म नाकारुन भाजपाला इतरच कारणांनी मतदान केलेले दिसते. अन्यथा भाजपाला एवढे यश मिळते ना.
सत्तेत असल्याचे जे काही अनुषांगिक फायदे असतात ते भाजपाला मिळणे स्वाभाविकच आहे कारण भारतीय राजकारणाची ती एक अपरिहार्यता आहे व भारतीय राजकीय मंडळींचा एकंदरीत राजकारणात असण्याचा उद्देश हा तसा काही लपून राहिलेला नाही. राजकीय मंडळींच्या डागाळलेल्या कारकिर्दीला एक संरक्षक कवच म्हणून सत्तेचा वापर केला जातो. या मंडळीमुळेच पक्षपध्दतीला नको तेवढे महत्व प्राप्त होत जणू एकादा पक्षच परिवर्तनाचे एकमेव हत्यार आहे असे दाखवत काही अपवाद वगळता शोषक टोळ्यांच्या स्वरुपात हे सारे पक्ष वावरू लागले आहेत. विविध पक्षांतील सरमिसळ हा अभ्यासाचा विषय ठरावा. भारतीय राजकारण हे काहीतरी मिळवण्याचे साधन व ज्यांनी ते अगोदरच मिळवलेले ते सांभाळण्याचे कारण हे सत्तेत असण्याचे महत्वाचे कारण समजले जाते. भाजपा सत्तेवर येताच ज्या तत्वहिनतेने राजकीय मंडळींनी भाजपात उड्या मारल्या त्या भाजपाच्या ध्येयधोरणांच्या प्रेमापोटी नसून स्वतःच्या स्वार्थापोटी होत्या. ही जी वाढ दिसते आहे व त्यामुळेच निवडणुकांतील निकालही काहीसे त्या अर्थाचे दिसू लागले आहेत. अजूनही भाजपातील इनकमिंग हे राजकीय महत्वाकांक्षी मंडळीच्या भाऊगर्दीमुळेच आहे. या मंडळीला आपल्या आसपास जे घडू लागले त्याची भिती वा जुमानत नसेल प्रत्यक्ष कारवाई व चौकशीची धमकी यातून ते साध्य केले जात आहे. केवळ याच कारणामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केवळ नावाला उरला असून केवळ कालहरण करत आपली इनिंग कधी संपते याच्या प्रतिक्षेत वावरतो आहे. 
यात विरोधी पक्षाची बाजू घ्यायचे तसे काही कारण नाही, परंतु सर्वासामान्य जनतेला कारभारात नेमके काय चालले आहे हे जर प्रबळ विरोधी पक्ष असला तर सत्ताधाऱ्यांची ज्या खुल्या पध्दतीने चिरफाड होऊ शकते त्यानी राजकारणाला व त्यातील ध्येयधोरणांना जनहिताचे वळण मिळत तशी दिशा देता येऊ शकते. नेमके तेच होत नसल्याने सर्वसामान्य, ज्यात शेतकरी प्रामुख्याने एकतर्फी व एकतंत्री निर्णयांचा बळी ठरतो आहे, व त्यातून आता कसा नेमका मार्ग काढावा याचे उत्तर कुठे मिळत नाही. नेमक्या या परिस्थितीचा शिवसेना अत्यंत चाणाक्षपणे आपल्या राजकारणासाठी वापर करून घेत आहे व सत्तेच्या समीकरणांत भाजपाही त्यांचे हे सारे राजकारण खपवून एक गैरराजकारणी पायंडा पाडते आहे. या साऱ्या राजकारणात सर्वसामान्य नागरिक मात्र हरवलेला वाटतो व कायदेशीर का होईना, परंतु लोकशाहीला अपेक्षित असलेल्या जनहिताच्या पावित्र्याचा बळी देत, राज्य तर आहे पण कुणासाठी हा मोठा प्रश्न उपस्थित करत सर्वसामान्यांची हतबलताच वाढवणारा ठरतो आहे. आज भारतापुढील खरी आव्हाने ज्यात दहशतवाद, पाकिस्तान-काश्मिर प्रश्न, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतीचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हे केवळ माध्यम व्यवस्थापनामुळे तेवढ्या प्रखरतेने स्पष्ट होऊ दिले जात नाहीत. एकतर्फी व एकतंत्री निर्णय घेण्यात स्थिर सरकारे हा शाप की वरदान याचा पुनर्विचार करायला लावणारी ही परिस्थिती आहे. काही प्रामाणिक माध्यमे अजूनही आपले मूलभूत कर्तव्य न विसरल्यानेच पर्यायांच्या शक्य़ताही वाढीस लागत एक वेगळा विचार मांडण्यास कारणीभूत ठरताहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब !!
                                                 डॉ. गिरधर पाटील girdhar.patil@gmail.com
   

No comments:

Post a Comment