Saturday 9 December 2017

आपली लोकशाही, असून अडचण, नसून खोळंबा !!



आपली लोकशाही, असून अडचण, नसून खोळंबा !!
          नवं कापड घेऊन आपल्या मापाचा सदरा शिवून स्वतः तो वापरणं वेगळं, आणि कुणाचा तरी अगोदरच शिवलेला आपल्याला होतोय का बघत वापरणं यात जेवढा फरक असेल तेवढाच फरक आपण व आपल्याला मिळालेल्या लोकशाहीच्या सदऱ्यात असू शकेल. स्वातंत्र्यानंतर आपल्याला जगात उपलब्ध असलेली त्यातल्या त्यात निकोप पध्दती म्हणून लोकशाही स्विकारावी लागली. त्यात गैरही काही नाही, मात्र लोकशाहीला मूलभूतरित्या आवश्यक असणाऱ्या परिस्थितीचा विचार व आवश्यक असणाऱ्या भूमिका जनतेत रुजवल्या न गेल्याने जे काही उगवते आहे ते मात्र लोकशाहीला अपेक्षित असेल असे मानता येत नाही. आपल्याकडे वैधानिक पातळीवर लोकशाही असल्याचे समजले जाते. सर्व प्रक्रिया लोकशाहीला अनुसरुन तिचे नियम व निकष पाळणाऱ्या, मात्र हे सर्व कां व कशासाठी करायचे याचा अर्थ न समजलेल्या जनतेला त्यातला नेमका जीव, मर्म वा आत्मा काय हे न समजल्याने या लोकशाहीला एक वेगळेच स्वरूप प्राप्त होत ज्यांच्यासाठी ही व्यवस्था असल्याचे समजले जाते, त्या जनतेचा मात्र प्रचंड भ्रमनिरास होऊ लागला आहे.
          लोकशाहीचा उगम ज्या देशात झाला तो देश खरोखर भाग्यवान समजला पाहिजे. कारण त्यावेळच्या प्रस्थापित व्यवस्थेतील गुणदोषांचे विश्लेषण होत आदर्श व्यवस्था काय असावी याचे वैचारिक मंथन होऊनच ही व्यवस्था निर्माण झाली असली पाहिजे. यात सामूहिक मानसिकतेचा मोठा सहभाग असावा. अर्थात त्या स्थलकालानुरूप त्यांच्या परिस्थितीजन्य परिमाणांचा त्यावर प्रभाव असणार हे निश्चित. समाजातील काही प्रबळ घटकांच्या प्रभावाखाली जेरीस आलेले मानवी समूह, मग ती सरंजामशाही असो, की एकाधिकारशाही, त्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात सामाजिक संतुलन राखण्याच्या दृष्टीने नेमका पर्याय काय असावा या प्रयत्नातून लोकशाहीचा जन्म झालेला दिसतो. आजतरी जगात सर्वात अशी निकोप व्यवस्था म्हणून लोकशाही समजली जात असली असली तरी ज्या देशात ती राबवली जाणार असेल तेथील संस्कृती, मानसिकता व त्या देशावर व त्यातील जनसमूहावर वर्षानुवर्षे झालेले संस्कार यांचा विचार होऊन लोकशाहीकरणाचे वेगळे प्रयत्न व्हायला हवेत, ते दिसत नसल्याने प्रत्यक्षात लोकशाही असूनही तिचे लाभ मात्र सर्वसामान्यांना मिळू द्यायचे नाहीत, अशा व्यवस्थाच अप्रत्यक्षरित्या कार्यरत झालेल्या दिसतात.
          या दृष्टीकोनातून भारतातील परिस्थिती बघितली तर ज्या देशात ही लोकशाही राबवायची तो एकमय असा देश कधीच नव्हता. शिवाय येथील जनतेत कित्येक शतकांच्या सरंजामशाहीचा प्रभावही रुजलेला व भिनलेला होता. सतत होणारी परकिय आक्रमणे व त्यातून निर्माण झालेली धर्मीय तेढ याचबरोबर जातीय वर्णव्यवस्था यामुळे हा प्रदेश व त्यातील जनसमूह असंख्य मार्गांनी विस्कळीत व असंघटित होते. या साऱ्या विविधतेत आपण पारतंत्र्यात आहोत व स्वतंत्र होण्यासाठी स्वातंत्र्य या किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले पाहिजे यातून भारत या देशाची प्रतिमा निर्माण झालेली दिसते. स्वातंत्र्यलढ्यात ज्या काही समाज, व्यक्ती, संस्थानिक, वा राजकीय पक्षानी एकत्रित येत लढा दिला असला तरी या साऱ्यांमध्ये एकवाक्यता वा एकविचार होता असे मानता येत नाही. आपण सारे या भौगोलिक प्रदेशातील समान पिडित असल्याने एक झाले पाहिजे अशा भावनेतून हा लढा निर्माण झालेला दिसतो. त्यामुळे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरवी चालवल्या जाणाऱ्या या व्यवस्थेतील लोक या संकल्पनेवरच अनेक प्रश्न उभे रहातात व हे लोक ज्यावेळी एकमय होऊन एका समान व्यासपीठावरून सामूहिक विचार करू शकतील त्यावेळी खरी लोकशाही आल्याचे मानता येईल.
          लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मिळालेला मत व तो बजावण्याचा हक्क हा मूलस्थानी मानला जातो. मात्र हा हक्कच जर अप्रत्यक्षरित्या धर्म, जात, पक्ष, आर्थिक स्वार्थ, उत्पादन व शोषणाची साधने यातून हिरावला जात हे मत संकुचित होत काही घटक उरलेल्या घटकांवर पर्याय न ठेवत हावी होत असतील तर लोकशाहीचा मूळ उद्देशच धुळीला मिळाला असे म्हणता येईल. म्हणजे वरील घटकांच्या व्यतिरिक्त विचार करत अधिक व्यापक वा सामूहिकतेने मतदान करण्यात असुरक्षितता वाटेल असे वातावरण तयार होणे हे लोकशाहीला अपेक्षित नाही. आज भारतात जे काही होते आहे ते अशा असुरक्षितेपोटी विविध घटकांत दुफळी माजवत ज्यांनी कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे अधिकार मिळवले आहेत ते लोकाच्यापेक्षा स्व चा विचार अधिक करत असल्याने लोकशाही असूनही त्यातील लाभांपासून वंचित असणारे घटक वाढू लागले आहेत. आपल्या निवडणूक पध्दतीतील कमतरतांमुळे निवडून येणाऱ्यांत नेमक्या या असंतोषाचे प्रतिबिंब उमटू शकत नसल्याने या वंचितांचा आवाजही ऐकेनासा होऊ शकतो. आज या लोकशाहीत लोक म्हणजे प्रबळ झालेले काही गट ज्यांचे उद्देश व स्वार्थ एक समजले जाऊ शकतात ते सक्षम, सक्रिय व प्रबळ झाले असून सर्वसामान्याना लोकशाहीचे कुठलेही लाभ न मिळू देण्यास कारणीभूत होत आहेत.
          आजच्या या लोकशाहीची प्रत परिणामकारक व जबाबदेही होण्यासाठी आवश्यक असणारे सुधार नेमके दूर्लक्षित होत असून ती सदृढ होण्याऐवजी लोकांच्या मनात तिच्या परिणामकारतेविषयी संदेह व संशयाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यातून हिंसात्मक पर्यायाला प्राबल्य मिळण्याची शक्यताही वाढीस लागते. लोकशाही सर्व स्तरांवर तेवढ्याच सक्षमतेने राबवता यावी यासाठी नव्या तरतुदी वा निवडणुक सुधारांची आवश्यकता प्रतिपादन केली जात असली तरी सद्यव्यवस्थेत स्वारस्य असलेल्यांच्या ताब्यात ते अमलात आणण्याचे अधिकार जात असल्याने त्या आघाडीवर अक्षरशः काहीच होत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे एनकेनप्रकारे एकदा सत्तेत प्रवेश मिळवला व तेथे टिकून रहाण्याचे कसब प्राप्त केले की सार्वजनिक निधीचा अपहार, भ्रष्टाचार व अनैतिक कृत्ये केली तरी त्यावर कुठलीही कारवाई न होऊ देता देशाचे आर्थिक, राजकीय व सामाजिक नुकसान करण्याचा पायंडा पडत चालला आहे. हे सारे प्रकार एवढ्या थराला पोहचल्याचे दिसते की यात हिंसाचाराचा समावेश होत सर्वसामान्य नको ते राजकारण या भितीने सामूहिक सहभागापासून वंचित राहू लागला आहे. यात निवडणुकांत पसरवली जाणारी दहशत व त्यातून येणारे अलोकशाहीकृत परिणाम यांनी खऱ्या लोकशाहीला कधी वाव मिळेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
          यावरचा उपाय म्हणजे देशात लोकशाहीकरणाची प्रक्रिया सक्षमतेने राबवली पाहिजे. सातत्याने निवडणुकांसारखे राजकीय कार्यक्रम घेत राहिले तर एक प्रकारचे विचार मंथन होत अनेक प्रश्नांवरच्या विविध बाजू लोकांपुढे येऊ शकतात. त्यातून आपले मत बनवण्याची सक्षमता येऊ शकते. राजकीय पक्षांनी दिलेली आश्वासने खरी की खोटी यावरचा निर्णय पाच वर्षांसाठी तुंबून रहातो व फसवल्या गेलेल्या जनतेला त्याविरोधात काहीएक करता येत नाही. पाच वर्षांनी एकदा निवडणूक या प्रारुपात देश पाच वर्षांसाठी जनसामान्यांसाठी संदर्भहीन ठरतो व आपले व देशाचे जे काही होते आहे ते पहाण्यावाचून गत्यंतर नसते. आज भारतीय जनता नेमकी याच मानसिकतेतून जात असून त्यांना खरा न्याय देऊ शकणारी लोकशाही मात्र असून अडचण नसून खोळंबा ठरते आहे !!
                                                                                  डॉ. गिरधर पाटील.

Saturday 25 November 2017

भाजपाचा वैचारिक - राजकीय तोकडेपणा.



    भाजपाचा वैचारिक - राजकीय तोकडेपणा.
          मानवी समूहांच्या व्यवस्थापनासाठी आजवर अनेक व्यवस्थांचा वापर होत आज सारे जग उदारमतवादी अर्थवादापर्यंत येऊन ठेपल्याचे दिसते. सुरवातीच्या काळात धर्म वा राज्यसत्तांचा यासाठी वापर झालेला असला तरी नंतरच्या काळात काही विशिष्ठ विचार असलेल्या तत्वप्रणाली मांडल्या जाऊ लागल्या. भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, उदारमतवाद या साधारणतः औद्योगिक पर्व सुरू झाल्यानंतरच्या काळात त्यांतील शोषणाच्या पार्श्वभूमीवर उदयास आल्या व त्यानंतर या विचारांचा प्रसार झालेला दिसतो. एकाधिकार वा हुकूमशाहीची काही उदाहरणे सोडली तर सरंजामशाहीकडून लोकशाहीकडे व त्यातही एकादा विशिष्ट विचारावर निष्ठा व्यक्त करणारी व्यवस्था असे त्यांचे स्वरुप होते. यावर विश्वास असणाऱ्या वा ते मानणाऱ्या जनसमूहांचे ध्रृवीकरण होत त्या त्या देशात तशा विचाराच्या राजवटी सत्तेवर आल्याचे दिसते. काळाच्या ओघात कुठली तत्वप्रणाली उपयुक्त वा परिणामकारक ठरली यावर या विचारांचे अस्तित्व निश्चित होऊ लागले.
          भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा वसाहतवादाची शिकार झालेला, सरंजामशाहीचा पगडा असलेला, एक देश म्हणून कुठलीही प्रतिमा निश्चित नसतांना, त्यासाठी कुठली तत्वप्रणाली स्विकारावी हा मोठा प्रश्न होता. दारिद्र्य, अतिमागासपणा, निरक्षरता, जातीधर्मावर आधारलेली समाजरचना, त्यातून आलेली सामाजिक आर्थिक विषमता, औद्योगिकरण वा बाजाराचा अभाव, यांना अनुरूप असलेली कुठली व्यवस्था असावी असे काही  नव्हते. यात त्यातल्या त्यात सोईची म्हणून मिश्र अर्थव्यवस्था स्विकारण्यात आली. एकीकडे जागतिक स्तरावर अमेरिकन भांडवलशाहीचा असलेला प्रभाव व दुसरीकडे नेहरूंवर पडलेली रशियन साम्यवादाची भुरळ यातून हा मध्यममार्ग स्विकारल्याचे दिसते. मूलभूत संरचना उभारणीत गुंतवणुकीचे प्रमाण लक्षात घेता त्यात सरकारने सार्वजनिक उद्योग म्हणून पुढाकार घ्यावा व इतर क्षेत्रे खाजगी क्षेत्रासाठी ठेवावीत अशी ढोबळमानाने ती विभागणी असावी. पुढच्या काळात झालेला महत्वाचा बदल म्हणजे घटनादुरुस्ती करून भारत हे एक समाजवादी राष्ट्र असल्याचे जाहीर करण्यात आले. समाजवादातील सरकारचे एकंदरीत महत्व लक्षात घेता लायसन-परमीट-कोटा राज येत आपल्या अर्थव्यवस्थेची जी काही अवस्था झाली तिच्यातून सुटकेचा मार्ग म्हणून एक्याण्णव साली बंदिस्तपणाला पर्याय म्हणून जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण स्विकारावे लागले व देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळेच वळण लागू शकले.
          यातून एक स्पष्ट होतेय की आजवर देश ज्या आर्थिक धोरणांनी चालत आला, ती चांगली किंवा वाईट हा भाग अलाहिदा, मात्र त्याच्या परिणांमाची वा मूल्यमापनाची एक फूटपट्टी उपलब्ध असे वा इतरत्र आलेल्या अनुभवाचा समुच्चयही जमेला असे. निदानासह त्यातून काय मार्ग काढावा हेही तसे बऱ्यापैकी उमगत असे. मात्र भाजपा सत्तेवर आल्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारांच्या नावाने म्हणून जे काही बदल अमलात आणले जात आहेत त्यात अर्थ व राज्यशास्त्राच्या दृष्टीने अनेक शंकास्पद जागा निर्माण झाल्या असून त्यातील चूका वा  अंमलबजावणीच्या अडचणी जाणवताच, वा राजकीय सोईसाठी, अत्यंत गंभीरतेचे आवरण चढवून घेतलेले निर्णय सहजगत्या फिरवण्यात येऊ लागले आहेत. या साऱ्यांना काही शास्त्रीय वा तार्किक आधार दिसत नाही. याच्या समर्थनार्थ देण्यात येणारी आकडेवारी वा नामांकने ही काहीही असली तरी जनतेच्या प्रत्यक्ष अनुभवाशी मेळ खात नसल्याने त्यांची विश्वासार्हताही धोक्यात आली आहे. या साऱ्या प्रकारातून नेमके खरे काय हे स्पष्ट होत नसल्याने देशाच्या अर्थव्यवस्था व परिणामे जनतेचे नुकसान होऊ लागले आहे. सरकारची यातून बाहेर पडण्याची धडपड सरकारच्या लक्षात येत नसली, वा त्यांना ते तसे दाखवायचे नसले तरी अगदी सर्वसामान्यांनाही काहीतरी चुकत असल्याचे जाणवू लागले आहे. राज्यकर्ते कुठेतरी चूकत आहेत, भांबावलेले आहेत, त्यांना मूळतः योग्य मार्ग निवडण्यात आलेले अपयश व पुढचा मार्ग शोधण्यात येत असलेल्या अडचणी यावरून त्यांच्या विचारसरणीतील तोकडेपणा स्पष्टपणे जाणवू लागला आहे.  
          हे असे कां होऊ लागलंय याची मूळ कारणे शोधतांना आपल्याला भाजप या पक्षाच्या जडणघडणीचे विश्लेषण करावे लागेल. अगदी जनसंघी असल्यापासून भारतीय राजकारणात वावरतांना या पक्षाने कुठली सिध्द आयडिऑलॉजी मांडत मते मागितली आहेत असे झाले नाही. उलट त्यातील राममंदिर, रथयात्रा, गोहत्याबंदी असे कार्यक्रम ठळकपणे लक्षात येतात. यातून त्यांना इप्सित मात्र काय गाठायचे हा जर कार्यक्रम लक्षात घेतला तर तोही कुठल्या अर्थवादी विचाराशी नाळ जुळलेला असल्याचे दिसत नाही. एक भौगोलिक प्रादेशिकतेवर आधारलेले एकधर्मी राष्ट्र हे जर त्यांचे ध्येय असेल व त्यासाठी सर्वसामान्य जनतेने त्याग करत, देश वा राष्ट्रप्रेमाने पेटून उठत ते गाठावे असा बहुधा तो कार्यक्रम असावा. या कार्यक्रमाला भाळून जर चौदाची सत्ता मिळाली असा भाजपाचा समज असेल तर गोष्ट वेगळी. खरे म्हणजे यावेळी त्यांना सत्ता मिळाली ही अगोदरच्या सरकारच्या अपयशी कारभाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय जनतेला जे काही आर्थिक कार्यक्रमाचे चित्र दाखवले त्यामुळे. जनतेने आपल्याला ज्या कारणानी सत्ता दिली आहे त्याची पूर्ती न करता आताशा जे काही कार्यक्रम राबवले जात आहेत ते एकतर आर्थिक बाजू न समजल्याचे निदर्शक आहेत वा त्यांच्या एकंदरीतच विचारसरणीतील तोकडेपणा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
          तशी कुठलीही विचारसरणी ही साऱ्यांचे समाधान करू शकेल अशी परिपूर्ण नसते. मात्र त्यात संतुलनाच्या जागा असाव्यात ही जनतेच्या दृष्टीने आशादायक बाब ठरू शकते. आज भाजपाची आपला धार्मिक कार्यक्रम व आर्थिक भासणारी धोरणे राबवतांना जी काही त्रेधातिरपिट उडते आहे ती एकाद्या अपूऱ्या चादरीसारखी आहे. धार्मिक कार्यक्रम राबवायला जावे तर आर्थिक क्षेत्र उघड्यावर पडते व आर्थिक धोरणे राबवायची तर ज्यांच्यामुळे आपण येथवर आलोय त्यांच्या डोळे उगारण्याची व परंपरागत मते गमावण्याची भिती. यात देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत होत असतांनाच सामाजिक ऐक्य व सर्वसमावेशकता धोक्यात येत असून अगोदरच कमालीची वाढलेली लाभार्थी व वंचितातील तफावत वाढीस लागली आहे.
          भाजपाचा हा राजकीय तोकडेपणा लक्षात येण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या सत्ताकारणाची निवडणूक रणनिती. चौदाच्या निवडणूकीत त्यांना हाती लागलेला शहरी मतदारांचा अल्लाउद्दिनचा दिवा सत्तेत आल्यानंतर घासूनपूसून वापरण्यासाठी तयार केला जात आहे. यासाठी शहरांवर विशेष कृपादृष्टी केली जात असून स्मार्टसिटी, मेट्रो, बुलेट ट्रेन, महामार्ग, योगा अशा शहरी कार्यक्रमांवर भर दिला जात असून ज्या ग्रामीण क्षेत्राला, विशेषतः शेतीला सरकारी मदतीची गरज आहे त्याकडे सहेतुक दूर्लक्ष केले जात आहे. आपल्याला आजवर सत्ता मिळू न देणाऱ्या घटकांना असे बाजूला काढण्याची रणनीती देशाच्या अर्थकारणावर अनिष्ट परिणाम करीत असली तरी त्यातून होणारे नुकसान वा तोटे सहन करण्याची तयारीही त्यातून दिसून येते.
          या तोकडेपणावर मात करण्याची पध्दतही अजब आहे. सनदशीर मार्गाने निवडणुका जिंकता येत नसतील तर एनकेनप्रकारे त्या जिंकायच्याच हा भाजपाचा अट्टहास दिसतो. त्यांची ही अपरिहार्यता, ज्यांच्यासाठी हे चालले आहे असे वाटते, त्या मतदारांना काय वाटते याचा थोडा मागोवा घेतला तरी या तोकडेपणावर मात करता येईल असे वाटते. प्रश्न रुग्णालयात डॉक्टर कोण असावे हा नसून, आहे त्याची बरे करण्याची क्षमता आहे की नाही याचा आहे. भाजपा कदाचित डॉक्टर म्हणून राहीलही, परंतु ज्यांच्यासाठी असणारे हे रुग्णालय असावे त्यांच्यासाठी ही बरे होण्याची जागा न ठरता नकळतपणे सनदशीरपणे होरपळण्याची जागा  होऊ नये म्हणजे झाले !!
                                                                                       डॉ. गिरधर पाटील.   

Thursday 12 October 2017

एकत्रित निवडणुका - लोकशाहीला मारक



    एकत्रित निवडणुका - लोकशाहीला मारक
आपल्याकडे कुठलाही निर्णय घेतांना त्याला जनहिताचे वा समस्या सुटण्याच्या शक्यतांचे भरभरक्कम आवरण चढवून जणू काही पर्याय नसलेला हा एकमेव निर्णय आहे असे भासवण्याची प्रथा पडत चालली आहे. गेल्या काही दिवसातील देशातील जनमानसावर व्यापकतेने चांगलेवाईट परिणाम करणारे निर्णय ज्या पध्दतीने घेण्यात आले त्याचा अनुभव ताजा असतांना परत एकत्रित निवडणुका घ्यायचा निर्णय ज्या पध्दतीने जाहीर होतोय त्यात अनेक शंकाना वाव मिळतोय. वास्तवात हा अधिकार निवडणूक आयोगाचा असतांना अगोदर सरकारच्या तोंडून हा निर्णय बाहेर पडावा व त्याला पाठिंबा देत निवडणूक आयोगाने हो ला हो भरावे हेच मुळात अतर्क्य आहे. म्हणजे लोकशाहीत आपल्याला मिळालेल्या स्वायत्तेचा वापर जर जनसामान्यांसाठी न होता विशिष्ट मार्गाने जाणार असेल तर त्या लोकशाहीला काही अर्थ नसल्याचे खेदाने म्हणावे लागते.
या निर्णयासाठी जी कारणे दिली जातात ती विशेषतः आर्थिक स्वरूपाची ती लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेच्या विरोधात जाणारी व समस्या न समजल्याने तिचे सुलभीकरण करण्याच्या प्रयत्नांची निदर्शक समजली पाहिजेत. मुळात आपला निवडणूक आयोग त्याची सुमार क्षमता व आवाका लक्षात घेता त्याच्या कार्यपध्दतीचे काय परिणाम होऊ शकतात हे आपण लक्षात घेत नाही. आम्ही या निवडणुकांना सज्ज आहोत असे म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाची सज्जता आजवरच्या अनेक निवडणुकांतून सिध्द झाली असून केवळ त्यावर अपिल करण्याची सोय व त्यातून काही निष्पन्न होत नसल्याने निवडणुकांतील सारे गैरप्रकार मागील पानावरून पुढे चालत त्यांना एकप्रकारे व्यावहारिक अधिष्ठान मिळाल्याचे दिसते आहे. निवडणुका असल्या म्हणजे हे सारे होणारच असे स्विकारण्यापत आपली मानसिकता आज झाल्याचे दिसते.
याचा विरोध आजवर झाला नाही असेही नाही. निवडणुकांच्या अगोदर वाघाची डरकाळी फोडत आपली वाघनखे परजत ज्या आवेगाने निवडणूक आयोग सर्वसामान्यांना धडकी भरवतो तो आवेश एकदा मतदान झाले की कुठे जातो हे कळत नाही. निवडणूक काळात झालेल्या बव्हंशी तक्रारी या दखल न घेताच निवडणूक आयोग टोपलीत टाकते व जणू काही झालेच नाही या अविर्भावात पुढच्या निवडणुकांच्या गैरप्रकाराला तोंड द्यायला सज्ज होते. अशा या निवडणुकांचा मूळ उद्देश वा त्याचे लोकशाहीतील महत्व न समजलेल्या निवडणुक आयोगाच्या या निर्णयाची चिरफाड होणे मात्र आवश्यक आहे.
मुळात या आयोगाच्या ज्या मूलभूत कमतरता आहेत त्यात स्वतःचे मनुष्यबळ नसणे, निश्चित कार्यप्रणाली नसणे, कारवाईच्या अधिकारांची पायमल्ली करणे व झालेल्या नुकसानीची जबाबदारी न स्विकारणे अशा प्रकारची आहेत. निवडणूक काळात त्या त्या सरकारातील प्रशासनातून हा आयोग मनुष्यबळ उसने घेतो व आपल्यावर लादलेली महत्वाची जबाबदारी पार पाडतो. या उसन्या मनुष्यबळावर नियंत्रण ठेवणारी आयोगाची यंत्रणा कितपत सक्षम असते हेही आजवर जगजाहीर झाले आहे. केवळ माध्यमातून सभ्य जनतेला दमदाटी करीत रहाणे व प्रत्यक्ष तक्रारींकडे दूर्लक्ष करीत रहाणे हा यांचा खाक्या असतो.  या प्रशासनाचे अगोदरच असलेले राजकीय हितसंबंध यात सक्रिय होत नसतीलच हे निवडणूक आयोगही छातीठोकपणे सांगू शकत नसतांना निवडणुका या निष्पक्षपणे पार पडतात हे कसे समजायचे ?
दुसरा मुद्दा येतो तो संसाधनांचा. पाच वर्षातून एकदाच येणाऱ्या या निवडणुकांना लागणाऱ्या यंत्रांचा खर्च यावेळी चौतीस हजार कोटी व त्याचबरोबर पावती देणाऱ्या यंत्रांचा खर्च साडे चौदा हजार कोटी सांगितला गेला आहे. हा सारा खर्च केवळ एकाच वेळी निवडणुका घ्यायच्या हट्टापोटी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या यंत्रांचा किमान संच करून तो प्रत्यक्षात वारंवार वापरून खर्च नगण्य पातळीवर आणता येऊ शकतो. निवडणुका झाल्यानंतर ही यंत्रे कुठे असतात त्यांची देखभाल वा छेडखानी कोण करते या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. परत नव्या निवडणुकांना नवी यंत्रे असा अव्यापारेष्यु व्यापार खर्च कमी करण्याच्या कारणाने केला जातोय. हा सारा खर्च संपूर्णरित्या कमी करून प्रभावीपणे निवडणुका कशा घेता येतात हे पुढे येणारच आहे. त्यामुळे एकत्रित निवडणुकांमुळे खर्च वाचेल हा एक भ्रम असल्याचे दिसून येईल.
हा झाला निवडणुक आयोगाच्या सक्षमतेचा प्रश्न. दुसरीकडे निवडणुकात भाग घेणारे पक्ष वा सामान्य जनता यांच्याही सोईचा भाग येतो. काही प्रस्थिपित राजकीय पक्ष सोडले तर लोकशाही प्रक्रियेत असणारे अनेक राजकीय पक्ष आपापल्या कुवतीनुसार निवडणुकात आपला सहभाग नोंदवत असतात. त्यांची संसाधने वा प्रचार यंत्रणा या एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निरूपयोगी ठरत त्यांना अत्यंत तुटपुंजीच्या वातावरणात या निवडणुकांना सामोरे जावे लागेल. पक्षातील वक्ते वा इतर प्रचार यंत्रणा नसल्याने माध्यमेही या नव्या प्रवेशकांकडे दूर्लक्ष करण्याची शक्यता असते. शिवाय लहान पक्षांचे प्रचारक वा वक्ते हे स्वतः उमेदवार असले तर पक्षाला त्यांचा काहीएक उपयोग न होण्याची शक्यता असते. प्रस्थापित राजकीय पक्षांना याचा फारसा त्रास जाणवणार नसला तरी या निमित्ताने होणाऱ्या गोंधळाच्या परिस्थितीचा त्यांना फायदाच घेता येण्याची शक्यता असते व तशी उदाहरणे अनेक दिसून आली आहेत.
एकदा पाच वर्षांतून या निवडणुका पार पडल्या सामान्य जनतेचा व लोकशाहीकरणाचा बिलकूल संबंध न येऊ देण्याचा कडेकोट बंदोबस्त या पध्दतीने करता येतो. एकदा मतदान केले ना, आता पाच वर्ष गडबड करू नका या न्यायाने सर्वासामान्यांना आपले जनमानस व्यक्त करणाचा दुसरा कुठलाच मार्ग रहात नाही हे लोकशाहीला मारक आहे. पाच वर्ष अशा अनिर्बंध वातावरणात देशाला एकटे सोडणे हेही घातकच ठरणार आहे. निवडणुका या सरकारवर अंकुश ठेवण्यापायी कशा वारंवार वापरता येतील हे पहाणे महत्वाचे असतांना लोकांना लोकशाही प्रक्रियेतून बाजूला करण्याचा हा प्रयत्न समजला पाहिजे.
यावर उपाय आहे परंतु तो स्विकारण्याची मानसिकता असायला हवी. लोकशाहीत निर्णय प्रक्रियेत प्रबळ असणारे घटक आपल्या विरोधात जाणारे निर्णय सहसा होऊ देत नाहीत याचा ही संकल्पना काही वर्षांपूर्वीच मांडूनही त्यावर अपेक्षित चर्चा झाली नाही आता या निर्णयाची पार्श्वभूमी असल्याने ती व्हावी ही अपेक्षा.  
                   सर्वसामान्य जनतेचा व लोकशाही प्रक्रियेचा तसा सरळ संबंध येतो तो निवडणुकीत व तोही पाच वर्षांतून एकदा. एकदा निवडणुका आटोपल्या की सा-यांचे लक्ष निवडून आलेले आपल्यासाठी व आपल्या नावाने काय काय करतात याकडे. मात्र एकदा अधिकार दिल्याने त्यात ढवळाढवळ करणे संसदीय लोकशाहीचा बागुलबुवा दाखवत अशक्यप्राय होत गेल्याने बदलासाठी पाच वर्ष परत वाट पहाणे हाती उरते. या पाच वर्षात घडणा-या घटनांचा आवाका व वेग बघता पुढच्या निवडणुकांच्या वेळी नेमकी काय परिस्थिती असेल हेही अनिश्चित. शिवाय निवडणुकांवर स्वार होणा-या कुणाच्या तरी अकस्मात मृत्युची सहानुभूती, परकीय आक्रमण, आर्थिक वा दहशतवादी अरिष्टांच्या लाटा यात नेमक्या जनतेच्या आशा आकांशा व्यक्त होतीलच असे होत नाही.
          यावरचा एक उपाय म्हणून नागरिकांचा या लोकशाही प्रक्रियेशी अधिकोधिक संबंध कसा आणता येईल हे पहाणे व भारतासारख्या महाकाय देशाच्या सा-या राजकीय, सामाजिक, आर्थिक निर्णय प्रक्रिया या पाच वर्षिय कालखंडात अडकवून न ठेवता तत्कालिन परिस्थितीच्या गरजा व लोकेच्छा यासह प्रवाही कशा होतील हे पहाणे आवश्यक ठरेल. या मधल्या काळात अनेक वेळा काही गंभीर व क्लिष्ट प्रश्नांवर सार्वमत व्हावे असे प्रकर्षाने वाटत रहाते मात्र आपल्याकडे निवडणुकांशिवाय असे सार्वमत व्यक्त होण्याचा दुसरा मार्ग नसल्याने पुढच्या निवडणुकीची वाट पहाण्याखेरीज दुसरा मार्ग नसतो. मात्र या परिवर्तनासाठी करावे लागणारे बदल वा सुधार हे मूलगामी स्वरूपाचे असल्याने सुरवातीला नैसर्गिक न्यायानुसार ते धक्कादायक वाटतील व स्वीकारण्यातही स्थितीवाद्यांना जड जाईल तरीही ते अपरिहार्य असल्याने त्यांचा विचार होणे आवश्यक आहे.
                   सध्या लोकसभेच्या निवडणुका, त्यात यावेळी परत विधानसभांच्या निवडणुकाही घेण्याचेही घाटते आहे, या एकाचवेळी घ्याव्यात असा कुठलाही कायदा व संकेत नाही. तो एक सोईस्कर व्यवस्थापनाचा भाग असावा व त्यासाठी निवडणूक आयोगाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेली आहे. या निवडणुकांमध्ये नागरिकांचा सरळ लोकशाहीकरणाशी दर पाच वर्षांनी एकाच वेळी संबंध येतो. या निवडणुकातून लोकप्रतिनिधी निवडणे हा मुख्य उद्देश असला तरी त्या निमित्ताने देशापुढचे प्रश्न वा समस्या यांचा एक सार्वजनिक उहापोह करत एक जनमत तयार करण्याचाही असावा. त्याचा सत्ताधाऱ्यांना कारभार करतांना एक मार्गदर्शक  उपयोग व्हावा हाही असतो. या निवडणुका जर लोकप्रतिनिधी व मतदारांचे घटनादत्त अधिकार न डावलता जर ठराविक कालावधित टप्प्याटप्प्याने घेतल्या तर देशात बराच काळ ही लोकशाहीकरणाची प्रक्रिया राबवता येईल. यात सातत्य व गतिमानता ठेवतानाच प्रत्येक खासदाराला त्याचा पाच वर्षाचा प्रातिनिधित्वाचा कालखंड पूर्ण करता यावा व कुठल्याही काळात लोकसभेत ५४० खासदारांची उपस्थिती हे दोन महत्वाचे निकष पाळता येतील.
          संकल्पना अधिक सोपी करण्यासाठी एक उदाहरण घेता येईल. पाच वर्षांच्या कालखंडात ६० महिने येतात. या काळात जर ५४० खासदार निवडून आणायचे असतील तर दर वर्षी १०८ खासदार निवडता येतील. म्हणजे या वर्षी निवडलेले १०८ खासदार त्यांची ५ वर्षांची मुदत पूर्ण करून बरोबर पाच वर्षांनी त्यांचे मतदारसंघ पुढच्या निवडीसाठी तयार राहतील. अशारितीने दर वर्षी वेगवेगळे मतदारसंघ खुले करून संपूर्ण भारतात कायमस्वरूपी लोकशाहीकरणाला पूरक असे वातावरण निर्माण करता येईल. मात्र ही लोकसभा दहावी, अकरावी वा बारावी असे संबोधता येणार नाही, कारण सतत कुठल्याही वेळी कायमस्वरूपी ५४० खासदार यात उपस्थित असतील.
          सुरूवातीला काही घटनात्मक पेच येऊ शकतील. यात निवडणुका लांबवण्याचा अधिकार वापरता येईल. लोकसभेची मुदत संपल्यानंतर ही पध्दत स्वीकारतांना दर वर्षी लॉटरी पध्दतीने १०८ मतदारसंघ निवडून त्यात निवडणुका घेता येतील. तोवर इतर सर्वांना त्यांची पाळी येईपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. एकदा पहिले चक्र पूर्ण झाले की लॉटरी पध्दतीची गरज रहाणार नाही, कारण पाच वर्षांची मुदत पूर्ण झालेले मतदारसंघ निवडणुकीला तयार असतील.
          लोकशाहीकरणाबरोबर होणारा महत्वाचा फायदा म्हणजे तत्कालिन प्रश्न व समस्यांवर पक्षांची भूमिका व जनमत काय आहे याचे प्रतिबिंब याचे प्रातिनिधिक सार्वमत या निवडणुकांमधून सर्वकाळ व्यक्त होऊ शकेल. जनमतानुसार पक्षांना, विशेषतः सत्ताधारी पक्षाला आपले निर्णय करावे लागतील, भूमिका घ्याव्या लागतील, हा एक मोठा फायदा यात दिसतो. शिवाय लोकानुयय करणारे व आश्वासने देऊन न पाळणारे पक्ष सावध होतील, कारण लागलीच दुस-या निवडणुकीस सामोरे जावे लागणार असल्याने असले प्रकार आपोआपच बंद होतील.
सध्या या निवडणुकांशी संबंधित असणारा निवडणुक आयोग, त्यात सहभागी होणा-या सरकारी यंत्रणा, राजकीय पक्ष, माध्यमे या साऱ्यांवर एकत्रित निवडणुकांचा अचानकपणे ताण येतो. या गोंधळाच्या वातावरणात मतदारही भांबावल्याने निर्णयक्षम रहात नाहीत. निवडणुक आयोगाच्या क्षमता लक्षात घेता मतदारसंघात एकादा निरिक्षक पाठवण्यापलिकडे त्यांना या निवडणुकांवर नियंत्रण ठेवता येत नाही. शेवटच्या दिवसांपर्यंत मतदार याद्या सदोष असतात. सनदी अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तयार होणाऱ्या याद्या सहेतुकपणे तशा ठेवल्या जातात असा आरोप होतो. प्रशासनही मनुष्यबळ व वेळ कमी असल्याच्या आड लपते. आता १०८च मतदारसंघात निवडणुका असल्याने अशा सबबी त्यांना सांगता येणार नाहीत. एकत्रित घेण्यात येणा-या निवडणुकांतील धांदलीचा गैरफायदा घेऊन अनेक लोकशाही विरोधी कृत्ये केली जातात. प्रशासन व पोलीस यंत्रणेचा ताण कमी झाल्याने ते अधिक कार्यक्षमतेने या समस्या हाताळू शकतील.
महत्वाचा भाग म्हणजे सा-या राजकीय पक्षांना सुसंघटीत होऊन निवडणुकांना सामोरे जाता येईल. आपली संसाधने, क्षमता, प्रचारक, वक्ते, वाहने या  ठराविक मतदारसंघात त्यांना सुयोग्यपणे वापरता येतील. माध्यमांना सर्व पक्षांना योग्य जागा व वेळ देता येईल. पेड न्यूज सारखे प्रकार आटोक्यात येतील. पाच वर्षांतील एक संधी अशी पक्षांना जी तातडी वा निकड तयार होऊन येनकेन प्रकारे निवडून यायचेच म्हणून होणारी गुंडागर्दी वा दडपशाही आटोक्यात येईल, कारण जनताही तेवढीच सुसंघटीत झालेली असेल.
म्हणजे अत्यंत शांत परिस्थितीत शांत डोक्याने या निवडणुका पार पडल्या तर जनतेच्या लोकशाहीकरणाबरोबर जनमताचे योग्य ते प्रतिबिंब सदासर्वकाळ संसदेत पडत असल्याने व जनाधाराची टांगती तलवार सतत डोक्यावर असल्याने राजकीय पक्षांच्या मनमानीने भारतीय लोकशाहीला जे साचलेपणाचे वा साचेबंदपणाचे स्वरूप आले आहे ते जाऊन एक प्रवाही गतिमान लोकशाही अस्तित्वात येऊ शकेल असे वाटते.
                                           डॉ. गिरधर पाटील. Girdhar.patil@gmail.com
         

Thursday 28 September 2017

शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण ?



    शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण ?
          एकदा नव्हे दहांदा कबूल केले की चलनबंदीचा निर्णय योग्य होता, तरीही त्या निर्णयाच्या परिणामांची मीमांसा करू नये असे मात्र मुळीच नाही. हा देश चालवण्याचे काही अधिकार सरकारला असले तरी साऱ्या देशावर व्यापकतेने व खोलवर परिणाम करणाऱ्या निर्णयांबाबत निर्णय करणाऱ्यांनी पुरेसा अभ्यास करूनच ते लादावेत अशी अपेक्षाही गैर नाही. अशा निर्णयामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास हा त्यांनी आले या भोगासी वा देशभक्तीचे आवरण चढवत सहन करावा हे आवाहनही तसे गैर नाही कारण त्यात तसे काही नुकसान नसून पैसे मिळण्यातील कठीणता वा अडचणी अशा प्रकारात ते मोडते. मात्र समाजातील एका मोठ्या वर्गाचे उत्पन्न हाती आले असता ते मुळातच विकले न गेल्याने त्यांचे सरळ सरळ आर्थिक नुकसान झाले आहे हा गुणात्मक फरक शहरी व शेतकरी यांच्या नुकसानीत दिसून येतो. शेतकऱ्यांना हाताशी धरून जिल्हा बँकांना चलन बदलाची परवानगी द्यावी हा राजकीय पदर असलेला दुराग्रह माध्यमांनी उचलून धरला तरी या निर्णयामुळे आपल्या बंदिस्त शेतमाल बाजारात ज्यांच्या हाती खरेदीचे अधिकार एकवटले आहेत त्यांनी मातीमोल भावाने हा माल खरेदी केला व शेतकऱ्याची माती केली त्याबद्दल कोणी ब्र शब्द बोलायला तयार नाही.
          शेतमाल बाजाराची परवड ही तशी तीनचार महिन्यांपासून म्हणजे नियमनमुक्ती व आडतीचा निर्णय या बाजारात लागू केल्यापासून सुरू झालेली दिसते. कधी नव्हे ते यावर्षी दोन पैसे फायदा व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा यावर्षी व्यापाऱ्यांनी दोन महिने लिलाव बंद ठेऊन कुजवला व त्याच दरम्यान हंगामाच्या सुरुवातीला स्वस्तात घेतलेला कांदा विकून ते मोकळे झाले. सोयाबीनच्या दर्जाबद्दल प्रश्न निर्माण करत सारा सोयाबीन किमान हमी दरापेक्षा कमी दरात खरेदी केला. डाळींबाबतही तसेच काहीसे झाले. हा बाजार इतक्या दयनीय अवस्थेत असतांना त्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेत काय हाहाकार माजेल याचा विचार वा अभ्यास नकरता चलनबंदीचा निर्णय लादला व त्या उंटावरच्या शेवटच्या काडीमुळे तर सारा बाजारच ठप्प झाल्याचे चित्र बघायला मिळायले. एकीकडे शेतात तरारलेल्या पिकाचे दोन पैशात रुपांतर करून वर्षाचा खर्च भागवण्याची स्वप्ने पहाणारा शेतकरी दारात आलेल्या लक्ष्मीचे आता काहीच हाती लागणार नाही या भावनेने शोकाकूल झाला. एकीकडे देशात केवळ अडीच ते तीन टक्के लोकसंख्या, ज्यात बऱ्याच प्रमाणात पगारदारही आहेत, आयकर भरून वा न भरून काळा पैशांच्या निर्मितीला कारणीभूत ठरत असतांना त्याच देशातील पंचावन्न टक्के लोकसंख्येच्या घटनादत्त उपजिविकेच्या अधिकारावरच घाला घालत त्यांना त्यांच्या हक्काचे उत्पन्नही मिळू द्यायचे नाही इतपर्यंत या निर्णयाचे परिणाम बघायला मिळतात. एकीकडे कर न भरणारा देशद्रोही, कर भरणारा व त्यासाठी रांगेत उभा रहाणारा देशभक्त ठरत असेल तर देशासाठी आपल्या उत्पन्नावर पाणी सोडणाऱ्या शेतकऱ्याला काय म्हणावे हा प्रश्न विचारण्याजोगा असला तरी शेवटी या नुकसानीला कोणाला तरी जबाबदार ठरवणे अपरिहार्य आहे. कारण यात शेतकऱ्यांचा काही एक दोष नसतांना त्यांना या सुलतानी, नव्हे तर तुघलकी संकटाला सामोरे जावे लागते आहे.
          वास्तवात सरकार ज्या मानभावीपणे देशहिताचे कारण देत या निर्णयाची भलामण करते आहे, वास्तवात ते तसे मुळीच नाही. आयकर विभागाकडे अनेक काळ्या पैशांची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांचा गतीने व निष्पक्षपणे निपटारा झाला असता तरी बराच काळा पैसा बाहेर येऊ शकला असता. आपल्या मर्जीतील उद्योगांचे करच नव्हे तर सरकारी बँकांची कर्जे व सरकारची इतर देणी यांच्या लवादावर सरकारला काही करावयाचे नाही. सर्वौच्च न्यायालयाने देशातील करबुडव्यांची व काळे धन बाळगणाऱ्यांची यादी प्रसिध्द करायला सांगूनही सरकार त्याला बधले नाही. एवढेच नव्हे तर देशातील एनपीए झालेल्या वा केलेल्या उद्योगांची यादीही सरकार प्रसिध्द करायला तयार नाही. लाखो करोंडोचे कर्ज बुडवून परदेशात राजरोसपणे चैन करणाऱ्या उद्योगपतींना हात लावायची सरकारची तयारी नाही. म्हणजे सरकार म्हणून स्विकारलेल्या प्राथमिक कर्तव्यांबाबत एवढा ढिसाळपणा असतांना केवळ अडीच टक्के लोकसंख्येतील काही चुकार लोकांसाठी साऱ्या प्रामाणिक देशाला वेठीस धरत देशभक्तीचे डोस पाजले जात आहेत.
          सरकार आता या निर्णयामागे लोक कसे उभे आहेत याचे भ्रामक चित्र माध्यमांतून रंगवण्याचा प्रयत्न करते आहे. देशातील ज्यांना थोडेफार अर्थशास्त्र कळते अशांच्या मते केवळ खोटे चलन या निर्णयामुळे बाद होईल. देशातील काळा पैसा जो चलनात वावरतो तो दोन तीन टक्के असून नवशिक्या भ्रष्टाचाऱ्यांकडेच असू शकतो. जे यात मुरलेले असतात ते आपला काळा पैसा चलनात ठेवतात हा सरकारचा भ्रम आहे कारण तो येण्यापूर्वीच त्याच्या गुंतवणुकीचे मार्ग ठरलेले असतात. आज शहरी वा ग्रामीण भागातील अचानक वाढलेले जमीनींचे भाव, गेल्या काही वर्षांत वाढलेली सोन्याची आयात, शेअर बाजारातील वाढती गुंतवणुक वा परदेशी गुंतवणुकीच्या नावाने येणारा वाढता पैसा हे सारे काळा पैशांच्या अवैध गुंतवणुकीचे परिणाम आहेत. मुळात साऱ्या सरकारी बँका करबुडव्या व कर्जबुडव्या उद्योगांमुळे अडचणीत आल्या होत्या व त्याचवेळी होणारे रुपयाचे अवमुल्यन त्यांना अधिकच महाग पडले असते. या अगोदरच्या काळा पैसा जाहीर करण्याची सारी आवाहने फोल ठरल्याने बँकेत पैसाच येईनासा झाल्यावर तो एनकेन प्रकारे कसा येईल या सुपीक डोक्यातून ही कल्पना आलेली दिसते. यातून जमा झालेल्या पैशांना ठेवी म्हणत सरकार व बँका आपली पाठ धोपटून घेत आहेत, वास्तवात तो सर्वसामान्य जनतेचा पैसा तुम्ही जबरदस्तीने जमा करायला लावून काढण्यावर निर्णय लादल्यानेच जमा झालेला आहे. चलन म्हणून त्याचा वापर मर्यादित झाल्यानेच बँकाच्या खात्यावर जमा दिसतो एवढाच त्याचा अर्थ आहे.
या विषयावर अत्यंत तपशीलवार अभ्यास करून मते मांडणाऱ्या अर्थक्रांतीनुसार देशाची अर्थव्यवस्था सुधार कार्यक्रमातील केवळ एक भाग वापरत एक क्रांतीकारी निर्णय असा आभास निर्माण केला जात आहे. त्यानी सुचवलेल्या कर सुधारणा व त्यातील भ्रष्टाचार कमी केला असता तरी यापेक्षा अधिक देशभक्ती सिध्द झाली असती. मात्र आता सत्ताकारण व पक्षीय राजकारणाच्या कुरघोडीत सर्वसामान्यांची अशीच फरफट होत रहाणार हे मात्र नक्की !!   
                                                             डॉ. गिरधर पाटील 9422263689